डॉ. केतकीताई पाटील यांची जडणघडण, व्यक्तिमत्वाचा विकास कसा झाला याबद्दल बोलताना त्यांनी आपला शैक्षणिक प्रवास सर्वांसमोर मांडला. १० वी नंतर डॉ केतकीताईंचे ११ वी आणि १२ वीचे शिक्षण मुळजी जेठा क़ॉलेजमध्ये झाले. सीईटीला उत्तम गुण मिळवल्यानंतर अनेक कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता. मात्र वडीलांचे शिक्षण पुण्यात झाल्याने पुणे शहरातील डॉ.डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला.
पुण्यात शिक्षणासाठी येण्याचा निर्णय आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने खूप काही शिकवले. आयुष्याचे अनेक धडे या कॉलेजमधील विविध ऍक्टीव्हिटीजद्वारे मिळाले असे डॉ केतकीताई आवर्जून सांगतात.
शिक्षण घेताना मिळालेले वैद्यकीय ज्ञान याबरोबरच समाजातील विविध घटकांशी कसे जुळवून घ्यावे. लोकांशी कसे बोलावे, अनेक स्तरावर व्यवस्थापन कसे करावे याचे शिक्षण या कॉलेजने दिले.
विद्यार्थीदशेतील अनेक उपक्रमांत भाग घेतला, खेळातील नैपुण्य पुढे आले, शिक्षणाव्यतिरिक्त असलेल्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे सुप्त गुणांना वाव मिळाला आणि आताचे असलेले मनमोकळेपणाचे आणि खेळीमेळीचे व्यक्तिमत्व पुढे आले.
आई आणि बाबांना वैद्यकीय व्यवसाय करताना बालपणापासून त्या पाहत आल्या. त्यामुळे अनेक प्रकारच्या नागरिकांशी कसा साधेपणाने संवाद साधावा याबद्दलचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते. पण कॉलेजमधील सहकाऱ्यांबरोबर विद्यार्थीस्तरावरील अनेक संस्था आणि गटांबरोबर काम केल्याने नेतृत्व गुणांना चालना मिळाली. आपण काही वेगळे करु शकतो हा आत्मविश्वास जागृत झाला. एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण घेताना मिळालेले शिस्तीचे धडे आयुष्यातील अनेक स्तरावर उपयोगी पडत आहेत.
खरोखरच गुरु आणि शैक्षणिक संस्था व्यक्तिमत्व विकासाचे काम करतात; हे डॉ केतकीताई पाटील यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळते आहे.