कुटुंब, मित्र, नातीगोती महत्वाची
Ketakitai Patil 19-Feb-2024
Total Views |
कोविड प्रतिबंधाच्या काळात मुंबईत जवळच्या नातेवाईकांवरील उपचारादरम्यान आलेला अनुभवाचा उपयोग करुन जळगावमधील रुग्णांवर उपचार करण्यासाठी कामाची दिशा ठरवण्यास डॉ केतकीताई पाटील यांना मदत झाली. वैद्यकीय उपचाराबरोबरच सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सोबतीला कुणी दिले तर असे रुग्ण लवकर बरे होऊ लागले. नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा सोबतीला कुणी असणे हे किती महत्वाचे असते. हे त्यावेळी प्रकर्षाने जाणवले.
आपले जीवन आपल्या लोकांसाठी उपयोगी येणे हेच तर आपल्या माणसांच्या ‘असण्याचे’ उद्दिष्ट आहे. शहरामध्ये पती पत्नी आणि मुले इतकेच कुटुंबात राहत असतो. त्यामुळे आपले विश्व संकुचित होते. शहराच्या धावळीच्या जीवनात आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. परंतु आपल्या एकत्रित कुटुंबासमवेत राहणे यातून खूप काही शिकायला मिळते असा ठाम विश्वास डॉ केतकीताई पाटील यांना वाटतो. एकत्र कुटुंबात राहिल्यामुळे आणि आपले नातेवाईक आपल्या जवळच्या अंतरावर असतील तर या सर्वांच्या एकत्रित येण्यामुळे आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वावरदेखील त्याचा प्रभाव पडत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे आजी आजोबा यांचा कुटुंबातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्ती म्हणून मुलांनाही त्यांचा फायदा होत असतो असेही डॉ केतकीताई पाटील यांना मनापासून वाटते.
आपल्या मूळ गावी आपल्याला मुलतः ज्या गोष्टी उपलब्ध असतात त्या शहरात कृत्रिमरित्या किंवा जवळपास न मिळण्याची शक्यता असते. आपल्या मुळगावी मात्र सर्वांच्या सहवासात आपली जडण-घडण होत असते. यासर्व गोष्टींचा विचार करून शहरापेक्षा गावाकडे म्हणजे जळगावमध्ये राहण्याचा निर्णय डॉ केतकीताई पाटील यांनी घेतल्याचे दिसून येते. आपण दिवसभर काम केले तरी थोडा का होईना वेळ आपण स्वतःसाठी काढू शकतो आणि नेमकी हीच गोष्ट शहरात शक्य नसल्याचे ठाम प्रतिपादन डॉ केतकीताई पाटील करतात. त्यांच्या अनुभवानुसार कारण शहरात कामावर जाण्या-येण्यासाठी लागणारा वेळ खूप मोठा असतो. हाच वेळ आपल्याला गावाकडे आपल्या कुटुंबाला , मुला बाळांना देवू शकतो. त्याचबरोबर मित्र मैत्रिणी , नातेवाईक यांना भेटू शकतो. शहरात मात्र आठवडाभराच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी रविवार असतो परंतु दिवस एक आणि कामे अनेक असल्याने भेटी गाठी शक्य होतातच असे नाही. एकाचवेळी आपण अनेक कामे करत असतो परंतु एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर आपल्या माणसांसाठी द्यायला आपल्याकडे वेळच नसेल तर जे करत आहोत त्याला काहीच अर्थ राहणार नाही असाही विचार डॉ केतकीताई पाटील प्रतिपादित करतात. शहरातले जीवन अनुभवण्यासाठी महिना दोन महिन्यातून दोन दिवस जायला काहीच हरकत नाही. परंतु आपल्या मूळ गावाशी आपली असणारी जवळीक , आपुलकी , बांधिलकी ही इतर कोणत्याच गोष्टीत असत नाही.